मराठी विभागाच्या वतीने वाचन संस्कृती समृद्ध करण्याच्या हेतूने दरवर्षी एक विशेष व्याख्यानाचे आयोजन केले जाते. यावर्षी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील व्ही.एस. नाईक महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर गणपत ढेंबरे यांचे ‘पुस्तकांच्या सोबतीने आयुष्य जगताना’ हे व्याख्यान आयोजित केले गेले.या व्याख्यानाच्या कार्यक्रमात भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश बाकरे हे उपस्थित होते. प्रस्तुत व्याख्यान गूगल मीट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन, पाहुण्यांचा परिचय आणि कार्यक्रमा मागील हेतू मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर गजानन कोर्तलवार यांनी विषद केले. महाविद्यालयातील काही प्राध्यापक आणि विद्यार्थी मिळून 42 लोक या व्याख्यानासाठी उपस्थित होते.
डॉक्टर गणपत ढेंबरे यांनी ‘पुस्तकांच्या सोबतीने आयुष्य जगताना’ या विषयाची मांडणी करताना वाचन करणे किती गरजेची गोष्ट आहे हे पटवून दिले. पुस्तके ही कायम माणसाच्या जीवनात ऊर्जा देणारी गोष्ट असते. वाचनातून माणसाला चांगल्या सवयी लागतात. समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही हे त्यांनी ठामपणे सांगितले. वाचन करणे आणि पुस्तकांच्या सहवासात राहणे यातून माणसाची बौद्धिक व मानसिक जडणघडण होते या मुद्द्याला अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांचे दाखले उदाहरण म्हणून दिले. व्याख्यानानंतर अध्यक्षीय समारोपात भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर यांनी विद्यार्थीदशेत वाचन करणे आणि पुस्तक खरेदी करणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश भाकरे सर यांनी महाविद्यालयातील वाचनसंस्कृतीच्या रुजविण्याच्या दृष्टीने मराठी विभागाचे कौतुक केले. तसेच या व्याख्यानाच्या बाबतीत समाधान व्यक्त केले.