भारतीय शिक्षण संस्थेचे श्री ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव- चंद्रपूर येथे गोंडवाना विद्यापीठ स्तरीय दोन दिवशीय स्व. परामानंद पाटील बोरकर स्मृती वाचन संस्कृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील 127 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातही मुलींची उपस्थिती ही लक्षणीय होती.
माणसाचा ‘स्व’ कसा घडत आला असून बायोलॉजिकल सेल्फ आणि सोशल सेल्फ याची सहभागींना ओळख करून देण्यात आली. भाषेचा शोध, लिपीचा शोध, कम्युनिकेशन, संवाद, वाचन आदी बाबींची इंटरॅक्टिव्ह पद्धतीने मांडणी करण्यात आली.
या कार्यशाळेत वाचनाबद्दल ‘वाचाल तर वाचाल’ या धमकीवजा रूढ कल्पनेच्या पलीकडे जाऊन वाचन ही प्रक्रिया मेंदूसाठी कशी कॉम्प्लिकेटेड असते आणि त्यामुळेच आजच्या संदर्भात कणखर माणूस होण्यासाठी वाचन करणे कसे गरजेचे आहे हे सहभागींना समजून सांगण्यात आले. कार्यशाळेतील मुला मुलींचा सहभाग अतिशय उत्साहवर्धक होता.
हरीती वाचन चळवळीच्या वतीने धनंजय कानगुडे आणि दीपक कसाळे यांनी ही कार्यशाळा घेतली. कार्यशाळेचे उद्घाटन झाले त्यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. जयंत बोरकर, प्रमुख अतिथी मा. सदानंद बोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाकरे, समन्वयक गजानन कोरतलवार हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे पदाधिकारी सुधाकर बोरकर, सुखदेव पाटील आनंदे, सिद्धार्थ बोरकर, भारत विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक रूपा सावरकर, श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल कामडी आदी मान्यवर उद्घाटन समारंभात आवर्जून उपस्थित होते.