- काळ अमुलाग्र बदलला तसं माणूसही. माणसाच्या जगण्या वागण्याच्या धारणाही बदलल्या. अनामिक भीती सर्वत्र भरून उरलेली.
- ” हल्ली माणुसकीच उरली नाही”
- “थोडी तरी माणुसकी ठेवा हो… “
- “अरे,माणूस आहेस का जनावर?”
- “लहान बघत नाहीत, की मोठं बघत नाहीत, लोक
- हैवानसारखं वागतायत.” इत्यादी इत्यादी अशी सामान्य व्यक्तीपासून ते प्रतिष्ठित व्यक्तीपर्यंत बोलली जाणारी विधाने हल्ली नित्याचीच झाली आहेत. हे आजच समाज वास्तव आहे. सुशिक्षित जेव्हा सारासार माणूसपणाची पातळी सोडून वागतो, तेव्हा निश्चितच त्या समाजाचा सामाजिक- सांस्कृतिक- शैक्षणिक- राजकीय स्तर व दर्जाही घसरत जातो. पर्यायाने तो समाज, देश अवनतीकडे वाटचाल करतो. दुर्दैवाने गेल्या काही वर्षातील आपली स्थिती अपेक्षा वेगळी नाही.”
- संपादकीय, परंतु २०२४
- या स्थितीवर चिंतन करण्यासाठी अत्यंत जाणीवपूर्वक भूमिका घेऊन लोकप्रिय विषय घेऊन दिवाळी अंक निघताना मूल्यभान ठेवून संपादन केलेला अंक. प्रत्येकाने वाचावा आपल्यातल्या माणूसपणाचा खोल खोलपर्यंत शोध घ्यावा, माणूसपणाला पोखरून टाकणाऱ्या आपल्या आत असणाऱ्या अनितीच्या किड्यावर फवारनी करणारा अंक…
- प्रस्तुत अंक का वाचावा ?
- १.आदिवासींची गरिबी हटवण्याचा सोपा मार्ग दाखवणारा, अनुभव आणि निरीक्षणावर आधारलेला एडवोकेट जयदेव गायकवाड यांचा लेख…
- २. महात्मा गांधींच्या समोर भारतीय स्वातंत्र्यसंग्रामा बरोबर महिलांचे प्रश्न देखील होते. त्यांच्या विचारातील वैश्विक संकल्पनांमध्ये महिलांच्या प्रश्नांचे चिंतन कोणत्या स्वरूपाचे आहे ? हे समजून घेण्यासाठी डॉ. वैशाली प्रकाश पवार यांचा लेख वाचण्यासारखा आहे.
- ३. जगाच्या नकाशावर देश आर्थिक महासत्ता होताना दिसतो; पण त्याचवेळी अन्नाविना मरणारा समाजही दिसतो, योग्य-अयोग्य सुविधा न मिळणाऱ्या समाज वर्ग दिसतो, निकृष्ट दर्जाचे शिक्षण मिळून फक्त सर्टिफिकेट होल्डर झालेला व बेकार तरुणवर्ग ही दिसतो. या वर्तमानातील गुंतागुंतीचा सखोल शोध घेण्यासाठी ‘मानव, माणुसकी आणि मानवता’ हा राघवेंद्र देशमुख यांचा लेख मुळापासून वाचण्यासारखा आहे.
- ४. तात्कालीक गरज असेल तर धान्याची शेती करणे गरजेचे असते. दीर्घकालीन भूक भगवायचे असेल तर वृक्षशेती करणे गरजेचे असते. पिढ्यानपिढ्यांची भूक भागवायची असेल तर मात्र माणसांची शेती करायला लागते.माणसं पेरणे हे दीर्घकालीन बदलांसाठी आवश्यक असते. हा मुद्दा अधोरेखित करणारे तपशीलवार संदर्भ देऊन अत्यंत समृद्ध करणारा लेख डॉ अविनाश सावजी यांनी लिहिला. खरोखर मुळापासून वाचण्यासारखा झालाय…
- ५. जगण्याला वेगवेगळे आयाम देत माणुसकीचा आकार देणारी माणसे भारतभर फिरताना भेटली आणि माणूसपणाच्या विविध व्याख्या गवसल्या म्हणून माणुसकी फुलवणाऱ्या अनुभवाचा वेध घेण्यासाठी विकास वाळके यांचा लेख वाचायलाच हवा.
- ६. मनुष्याचे मनुष्यपण त्याच्या विवेकी विचार करण्याच्या बुद्धीसमर्थ्यात आहे. हा विवेकी विचार संपला तर माणूस शिल्लक कसा राहील? आपण वेळीच सावध झालो तर आपले पतंग आपण थांबवू शकतो. म्हणूनच आपण अखंड सावध राहिले पाहिजे असे ‘गीता’ आपल्याला सांगते. त्यातील संदेश नेमकेपणाने ‘मानवी मनाची घसरगुंडी या एडवोकेट देवदत्त दिगंबर परुळेकर यांच्या लेखात वाचायला मिळते.
- ७. जात, पोटजात, धर्म, वंश, भाषा यावरून माणसे एकमेकांचे दुश्मन होत असल्याचे दुर्दैवाने आज पाहायला मिळत आहे. राजकारणात व समाजकारणात कमालीचे वैमानस्य दिसून येते. या क्षेत्रातील काहीजण तर, माणसे आहेत की सैतान,असा प्रश्न पडतो. एकीकडे समाज माध्यमातून हिंसा पसरवली जात असताना दुसरीकडे या माध्यमांचा उपयोग करून संकटग्रस्तांना मदतही पोहोचवली जात असते. म्हणूनच जगभरातील आणि भारतातील माणूसपणाची ध्वजा फडकवणाऱ्या विविध संदर्भाची उजळणी करणारा लेख हेमंत देसाई यांनी लिहिला हा लेख समृद्ध करणार आहे.
- ८. या अंकात समीर गायकवाड यांचा ‘गिरीजाबाई: गर्दीत विरघळलेल्या चेहऱ्याची गोष्ट’ हा लेक समाविष्ट आहे. समाजाने तुच्छ लेखलेल्या, झिडकारलेल्या, बहिष्कृत केलेल्या वंचित, शोषित, घटकात माणुसकी ओतप्रोत कशी दिसते? हे जाणून घेण्यासाठी, आपल्यात माणूसपणा शिल्लक असेल तर आतून गलबलून टाकायला लावणारा लेख निश्चित वाचलाच पाहिजे.
- ९.एकनाथ पाटील यांचा ‘लिमिटेड माणुसकीचे निवडक अनुभव वाचताना एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते. पैसा, प्रसिद्धी, संपत्ती या गोष्टी तात्कालिक असतात. ज्यांच्या विषयी सर्वांना प्रेम वाटतो. असा माणूस हयात नसेल तरी लोक मागे त्याची चांगली आठवण काढतात. त्याच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतात. माणसांच्या आयुष्याची ही फार मोठी कमाई असते. ही कमाई जाणून घेण्यासाठी निश्चितपणे वाचायला हवा असा हा लेख.
- १०.मानवी जीवनात भावनिक बुद्धिमत्ता किती महत्त्वाचा भाग असतो हे समजून घेण्यासाठी अपर्णा चव्हाण यांनी ‘माणुसकी आणि भावनिक बुद्धिमत्ता’ अशी सांगड घालून लिहिलेला लेख खरोखर महत्त्वाचा आहे.
- ११. कट्टरता सोडून मानवतेचा विचार जपणही काळाची कशी गरज आहे हा मुद्दा पटवून देणारा राजाभाऊ चोपदार यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहे.
- १२. शिक्षण कोलमडले की राष्ट्र ढासळतो याचे पुरते भान न ठेवता शिक्षणातील मूल्य हरवणाऱ्या काळाचा वेध घेत विचार करायला लावणारे शिक्षण किती महत्त्वाचे आहे. हे पटवून देणारा लेख मी स्वतः लिहिलेला आहे.
- १३. या अंकाचा मूळ गाभा लक्षात घेऊन दुसऱ्या भागात कविता संपादित केलेला आहे. अजय कांडर यांनी या कविता विभागावर लिहिलेले टिपण कविता निर्मितीच्या दर्जाकडे लक्ष वेधून घेणारे आहे. तरंगणाऱ्या कवींना भानावर आणणारे विचार यात वाचायला मिळतात.
- प्रत्येकाने वाचावा, इतरांना वाचायला द्यावा, आपल्या घरी संदर्भ म्हणून संग्रह्य करावा असा यावर्षीचा ‘ परंतु ‘ दिवाळी अंक निश्चितपणे समृद्ध करणार आहे.
- सुशील धसकटे यांनी फार मेहनत घेऊन हा अंक संपादिला आहे. अनेक लोकप्रिय विषय घेऊन दिवाळी अंक निघताना मार्केटच्या लोकप्रिय विषयाला फाटा मारून मानवी जीवन उजळून जावे, आपल्या जीवनातील अंधकार या दिवाळीच्या निमित्ताने दूर व्हावे आणि माणूसपणाचा प्रकाश सर्वत्र पसरावा असा उदात्त हेतू ठेवून प्रस्तुत अंक केला. त्याबद्दल धसकटे यांचे मनापासून अभिनंदन…..
- अंक खरेदीसाठी…..
- दिवाळी 2024
- परंतु, किंमत 250 /-
- संपर्क -9822266939