ट्रेन सुटली असती तर………..

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 74 विद्यार्थी व 10 शिक्षक असे 84 जन घेऊन महाविद्यालयाची सहल मी महाबळेश्वर महाड रायगड गणपतीपुळे व हरिहरेश्वर येथे घेऊन गेलो. महाबळेश्वर चा निसर्गरम्य परिसर, महाडचे चवदार तळे, गंधार पार्ले येथील बुद्ध लेण्या, तथा रायगड येथे 2167 पायऱ्या चढून छत्रपती शिवाजी महाराज यांचे राहण्याचे ठिकाण, राज्याभिषेक व समाधी स्थळ  चढून डोळ्यात सामावून घेतले, गणपतीपुळे येथील मंदिर दर्शन, समुद्रकिनाऱ्याचा आनंद व केशवसुत यांचे स्मारकाच्या आठवणी घेऊन निघालो थेट हरिहरेश्वरला, शेवटच्या दिवशी जंजिरा किल्ला याही डोळा याही देह बघायचा असं ठरवून निघालो, दोन वाजता परतीचा प्रवास करायचा असं ठरवलं ही, पण ट्रॅव्हल्स मालकाच्या अडचणीमुळे आम्ही जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही मात्र मोठ्या गाड्या घेऊन जाणारे जहाज मध्ये प्रवास करून थोडासा आनंद घेतलाच, त्यानंतर दिवेआगर समुद्रकिनारी जाऊन तेथील जलक्रीडा खेळ करून मुलांनी उत्साह मावळू दिला नाही, आणि परतीचा प्रवास सुरू झाला. सकाळी नऊ वाजता नाश्ता झाल्याने दुपारी दोन वाजता सर्वांना भुका लागल्यात तेव्हा आम्ही दिवेआगार येथून निघालो होतो. एक तासानंतर मी हॉटेल आनंदवन यांना फोन करून जेवण तयार करण्यास सांगितले. आमची पहिली ट्रॅव्हल पोचली व जेवणास सुरुवात झाली. दुसरी ट्रॅव्हल येईपर्यंत त्यांना जेवण तयार राहील असा तो बेत होता, पण त्या ट्रॅव्हलच्या ड्रायव्हरचा फोन आला की ट्रॅव्हल गरम झाली तेव्हा ती एक किलोमीटर दूर होती, त्यांना म्हटलं तिथेच थांबा, आम्ही आमची ट्रॅव्हल पाठवली व तेथील 42 विद्यार्थ्यांना हॉटेलपर्यंत घेऊन आलो. तोपर्यंत आमचं जेवण आटोपलं होतं, त्यांचं जेवण झाल्यावर त्या ट्रॅव्हलच्या ड्रायव्हरला ट्रॅव्हल आणायला पाठवलं, तो आला तेव्हा कळलं की ट्रॅव्हलचे ब्रेक फेल झाले. आता चार वाजले होते, पुन्हा आम्हाला पाच तास प्रवास करायचा होता, मी त्या ट्रॅव्हलच्या ड्रायव्हरला म्हटलं की पुढच्या गावापर्यंत आम्हाला सोड तिथून आम्ही एसटी महामंडळाची बस करून पुण्याला पोहोचू, आमच्या ड्रायव्हरने ती ट्रॅव्हल व त्या ट्रॅव्हलच्या ड्रायव्हरने आमची ट्रॅव्हल चालवली आमचा ड्रायव्हर म्हटला की ब्रेक फेल झाले, लगेच थांबवले, मागोमाग दोन एसटी बस आल्या पहिली साधारण असल्यामुळे ती सोडली दुसरी जलद असल्याने त्यात सर्व मुलांना बॅगेसहित बसा म्हटलं, मुलींना मी माझ्या ट्रॅव्हलमध्ये बसवलं आणि अगदी दहा मिनिटांमध्ये आम्ही बस सोडली, त्यामागे आमची पण ट्रॅव्हल्स निघाली तेव्हा सहा वाजले होते, पुढे घाटाचे रस्ते, तामणी घाट जो फार वळणदार आहे, तिथून आमची ट्रॅव्हल्स जात होती ड्रायव्हरने जरा वेगातच हाणली, मधे मधे हृदयाचे ठोके वाढत होते पण माझा विश्वास त्या ठोक्यावर मात करत होता आणि आम्ही पोहोचणार असं वाटत होतं. बसचा मागोवा मी घेत होतो, एसटी बस म्हटलं की तिचा कुठल्या एका ठिकाणी दहा पंधरा मिनिटांचा थांबा असतो कारण घाटावर ती बस चालली असते पण तिथे जे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग होते त्यांनी त्यांना विनवणी केली की आम्हाला साडेनऊ पर्यंत पोहोचायचं आहे, त्यामुळे त्या बस ड्रायव्हरने अगदी थोडा विसावा घेऊन  जेवढ्या लवकर पोहोचवता येईल तेवढं पोहोचू अशी हमी दिली. घाटाचे वळणे घेत घेत आमची ट्रॅव्हल पुण्यात वेशीवर पोहोचली पण आता ट्राफिक सुरु झाली नऊ वाजून गेले या ट्राफिक मधून निघताना अजून धडधड व्हायला लागली कारण रात्री दहाला  काजीपेट एक्सप्रेस सुटणार होती. बस अजून आमच्या मागेच होती. ती अजून पोहोचलीच नाही साडेनऊ वाजता ती पुण्यात आली. आम्ही मात्र ट्राफिक मधून वाट काढत कसेबसे पावणेदहाला रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. आमच्या हातात पंधरा मिनिटे होती सर्व मुलींना त्यांच्या सामानासकट उतरवत सरळ प्लॅटफॉर्मवर जायला सांगितले. मुलींवर मी मोठ्याने ओरडलो की जर मी आलो नाही तर गाडीची चैन खेचून गाडी थांबवा त्या सर्वांनी  मला आस्वस्थ केलं की तुमच्याशिवाय आम्ही गाडी सुटू देणार नाही. नेहमीप्रमाणे फलाट क्रमांक पाचवर येणारी गाडी तीन वर लागली होती. आमच्या गाडीतून उतरता उतरता एका मुलीचा पाय मुरगळला तिला चालताच येईना बाकी मुली निघून गेल्या, मी थांबलोय कारण माझ्याकडे बाकी मुलांच्या बॅग्स होत्या, त्या मुलीला म्हटलं तू कसंही करून हळूहळू जा, आपल्याकडे फक्त दहा मिनिटे शिल्लक आहेत ती रडली, रडत रडत हळुवारपणे निघाली कारण तिला खरंच चालता येत नव्हतं. त्या बसचा मी मागवा घेतला ती बस एसएनडीटी विद्यापीठाच्या जवळ मेट्रो रेल्वे स्टेशनवर विद्यार्थ्यांना उतरवून ते सर्व मेट्रो नी रेल्वे स्टेशनवर येणार होते. माझ्याकडे आता दहा मिनिटे शिल्लक होती, ती मुलं उतरली, त्यांना सरळ माझ्याकडे यायला सांगितलं त्यांनी त्या मुलीला बघितलं जिचा पाय मुरगळला होता तिला चालता येत नव्हतं,  मुलांनी व तिच्या भावांनी सरळ त्या मुलीला उचललं आणि अक्षरशा प्लॅटफॉर्मवरून  चढून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उतरून डायरेक्ट तिला गाडीच्या डब्यामध्ये टाकले आणि माझ्याकडे काही मुले बॅग घ्यायला आली, बॅग अक्षरशा उचलली, आम्ही धावलो डब्यामध्ये शिरलो सर्वजण बसतच आहोत तर आमची रेल्वे गाडी सुरू झाली, आमची रेल्वे  सुटली असती तर………………

Reach us @

Shri Dnyanesh Mahavidyalaya, Nawargaon,

Chimur Road, Sub-Distt – Sindewahi, Distt – Chandrapur, PIN – 441223 (M. S.)

Locate us

Our contacts

Office Hours

Monday to Friday

10:00 am – 05:00 pm

Saturday

07:30 am – 11:30 pm