वैराटचे जंगल अत्यंत अविस्मरणीय अनुभव…
सातपुडा पर्वत रांगा एका आगळ्यावेगळ्या जंगलांनी व्यापलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ज्या परिसरातून मी स्वतः येतो. ते जंगल पठारी स्वरूपाचे आहे. एका रेषेत पसरलेले हे जंगल आहे.
वैराटचे सातपुडा पर्वतावरील हे जंगल असे पठारी नाही. खूप खालीवर, चढ उतार असणारे हे जंगल फार आगळे वेगळे आहे. बाराशे फुटावर विविध डोंगररांगावर जिप्सी ने चढत हे जंगल अनुभवावे लागते. वर काही ठिकाणी गवताळ पठार आहे. जिथे खूप मोठ्या प्रमाणात सांबर, मोर पाहायला मिळतात. 129 प्रकारच्या विविध गवताने व्यापलेल्या या जंगलात. विविध प्रकारची वृक्षप्रजाती पाहायला मिळते. खूप मोठ्या दऱ्या, दूर आणि जवळून दिसणारे डोंगर रांगा. केवळ डोंगररांगा नाही तर एका डोंगरामागे दुसरे डोंगर, दुसऱ्या मागे तिसरे, तिसऱ्या मागे चौथे असे एकामागे एक लपून आपल्याला डोकावून पाहतायत की काय ? असे वाटून जावे इतके डोंगरपदर दूरवर नजर गेले की अनुभवायला येते.
विविध ठिकाणाहून डोंगरपदर पाहायला मिळते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अगदीच थंडी पडलेल्या दिवसात हे जंगल अनुभवणे म्हणजे फार वेगळा फील येतो. जंगलातली थंड हवा, पक्ष्यांचा किलबिलाट, मधूनच सांबारच्या झुंडी, वेगवेगळ्या प्रकारच्या गवतांच्या फुलांच्या रंगांची उधळण आपले स्मृतिपटल श्रीमंत करते. 129 प्रकारच्या विविध जातीच्या गवतांना अत्यंत सुरक्षित उब देणारी ही डोंगरे कधीच एकमेकांशी भांडत नाही. या गवतावरील उगवलेल्या विविध रंगांच्या फुलांकडे पाहून… माणूस म्हणून खूप शिकवण मिळते. निळे, पिवळे, केशरी, लाल अशा रंगांची विविध आकारांची गवतावरील फुले ही सफारी करताना आपले लक्ष वेधून घेते. हे सर्व रंग अत्यंत शांततेने एकोप्याने शेकडो वर्षापासून एकत्र नांदताना दिसते.
चिखलदऱ्यातून वैराट जंगलाचा रस्ता पकडल्यावर काही किलोमीटर आत गेल्यावर अगदीच घनदाट जंगल संपले की एक छोटे पठार येते. समोर केवळ एका घराचे गाव नजरेस पडते. आपल्या जिप्सीवर असणाऱ्या गाईडला हे घर दिसताच आपण प्रश्न करतो. एवढ्या जंगलात हे एकच घर कसे? अगदीच समोरासमोर जिल्हा परिषद शाळेची पडकी इमारत. एक-दोन घराची अवशेष आणि सर्वात मागे चार लोक असणारे एक कुटुंब. जे अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत दिसतात. एवढ्या घनदाट जंगलात हे चार लोक कसे राहत असतील? कोरकू या आदिवासी जमातीतील हे लोक. यांची भाषा जगातल्या अत्यंत धोकादायक पातळीवरील कोरकू बोली. योग्य मोबदला मिळत नसल्याकारणाने हे कुटुंब अजूनही त्याच गावात जंगलात वास्तव्याला असल्याचे गाईडने सांगितले. त्या घराला भेट देण्याची खूप इच्छा होती. गाईडला त्या घरापर्यंत जिप्सी घेऊन जाण्याची विनंती केली. पण तसे करता येत नाही. आम्हाला तिकडे जाऊन पर्यटकांना त्यांची भेट घेऊन देण्यास निर्बंध आहे. असे त्याने सांगितले. यावेळेस खूप प्रश्न मनात येऊन गेले. त्या घरात कोणी लहान मुले असेल तर त्यांच्या शिक्षणाचे काय? राशन, आधार, शाळा, शासकीय योजना यापासून हे कुटुंब वंचित तर नसेल? अडीअडचणीत हे लोक शेजारीही नसल्याने कोणाशी बोलत असतील? फोनचे कव्हरेज कधी कधीच मिळायचे. यांच्याकडे संपर्क साधने कोणती? असे अनेक प्रश्न रुंजी घालताना. जंगलात आत आत आम्ही जात होतो.
सूर्य मावळतीला लागलेला असताना. डोंगरावरून आपल्या सर्व प्रकाशपंखांना तो सावरून घेताना डोंगरावर होणारा प्रकाशस्पर्श, सातपुडा पर्वतावरील वेगवेगळ्या डोंगरांची रूपे, मधूनच जिप्सीतून जंगल न्याहळणाऱ्या,पैशाच्या बळावर जंगलातील शांतता भंग करणाऱ्या माणसांना पाहून सांबरांची होणारी धावपळ, अत्यंत रुंद असे जंगलातील कच्चे रस्ते, रस्त्यावरील वाढलेले गवत नुकतेच कापलेले, पक्षांचा किलबिलाट, अगदीच जंगलातून जिप्सी पुढे जाताना एखादे मोठे मोर आपल्या गाडीवरून उडत जाताना अनुभवणे म्हणजे खरोखर वैराटचे जंगल आपले आयुष्य वाढवते. एका अर्थाने जंगलात जाऊन आपण तेथील प्राणीपक्षांच्या दैनंदिन जीवनात उगीच हस्तक्षेप करतो असे वाटले. माणसाने केलेली व्यवस्था, जंगल सफारीतून शासनाच्या वनखात्याला मिळणारे उत्पन्न, स्थानिक गाईड आणि जिप्सीच्या मालकांना मिळणारे रोजगार एवढे ठीक असले तरी… पैशाच्या बळावर जंगल सफारी करणारा माणूस हा जंगलातली निरव शांतता, अत्यंत नितळ वातावरण, शुद्ध हवा याची नासधूस करतो असे 08:29:04 जाते. असे न वाटणे म्हणजे जंगलाची समृद्धी न कळणे असेही वाटते.
जंगल अनुभवताना जंगलाचा मानवी जीवनाशी अन्वयार्थ लावला तर जंगलापासून खूप शिकायला मिळते. जंगलाचाही एक स्वभाव असतो. इतक्या विविध गोष्टीला आपल्या स्वतःत सामावून घेत जंगल सर्वांचेच पालन पोषण करतो. वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वेली, पक्षी, प्राणी, गवत, फुले, या फुलांचा रंग अशा वैविध्याला बांधून जंगल समृद्ध होते. या विविधतेत एकात्म साधत सर्वांचे पालन पोषण जंगल करीत असते. जंगलातील सर्व विविधता एकमेकांवर आधारित असते.
या दृष्टीने चिखलदऱ्याला गेल्यावर निश्चितपणे वैराट चे जंगल अनुभवले पाहिजे. जंगलात जाताना कुठल्याही प्रकारचा आवाज करू नये. सोबत खायला काही घेऊन जाऊ नये. कुठल्याही प्रकारचे प्लास्टिकचे रॅपर, रिकामी पाण्याची बॉटल जंगलात फेकू नये. आपण शांत राहून माणसापेक्षा अत्यंत श्रीमंत असणाऱ्या जंगलाचा स्वभाव, जंगलाची संस्कृती समजून घेतली तर आपल्याला स्वतःला जंगल परिपक्व आणि समृद्ध करीत असते. हा फील वैराटचे जंगल फिरताना निश्चित आले. काही फोटो आपल्यासाठी शेअर करीत आहे…