विशेष वार्षिक शिबिर – अहवाल 2023
श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने दिनांक 30 डिसेंबर 2022 ते 5 जानेवारी 2023 या दरम्यान मौजा मीनघरी तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले. “अंधश्रद्धा मुक्ती आणि पर्यावरण रक्षणासाठी युवक” अशा मध्यवर्ती कल्पनेवर या शिबिराचे भर होते. एकूण 50 स्वयंसेवक या शिबिरात दाखल झाले होते. या संपूर्ण शिबिराचा तपशीलवार अहवाल खालील प्रमाणे.
दि. 30/12/2022
विशेष वार्षिक शिबिराच्या आयोजनासाठी दिनांक 30/12/2022 रोजी 50 स्वयंसेवक कार्यक्रमाधिकारी आणि सह कार्यक्रमाधिकारी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालय मिनघरी येथे दाखल झाले. सात दिवशी शिबिरासाठी श्रमदान करण्याच्या दृष्टीने वीस पावडे, दहा टीकास, वीस घमेले, ग्रीन मॅट, स्टेज चे संपूर्ण साहित्य, भोजनाचे संपूर्ण साहित्य, विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्था, स्वयंपाकाची व्यवस्था शिबिर स्थळावर या सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यात आले.
सात दिवशीय शिबिराचे कार्य नियोजन
राष्ट्रीय सेवा योजनेचे हे सात दिवस शिबिर यशस्वी व्हावे म्हणून पहिल्याच दिवशी दहा दहा स्वयंसेवकांचे पाच गट करण्यात आले. या संपूर्ण गटांना नाव देण्यात आले. पहिल्या गटाला छत्रपती शिवाजी गट, दुसऱ्या गटाला महात्मा ज्योतिराव फुले गट, तिसऱ्या गटाला सावित्रीबाई फुले गट, चौथ्या गटाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट, व पाचव्या गटाला संत गाडगेबाबा गट अशी नावे देण्यात आली. सोबतच संपूर्ण सात दिवशीय शिबिराच्या आचारसंहिता सर्व स्वयंसेवकांना समजावून सांगण्यात आली.
दि. 31/12/2022
प्रार्थना योगासने
पहाटे पाच ते सहा विद्यार्थ्यांना उठवून तयारीसाठी वेळ देण्यात आला. सहा ते साडेसात पर्यंत प्रार्थना, राष्ट्रीय सेवा योजनेचे लक्षगीत, स्फूर्ती गीत घेण्यात आले. तदनंतर लगेच योगासने आणि प्राणायाम हे करण्यात आले.
चहा नाश्ता आणि श्रमदान
चहा नाश्ता करून मीनघरी ग्रामपंचायतच्या निर्देशाप्रमाणे, पहिल्या दिवशी संपूर्ण गावाची ग्राम स्वच्छता करण्यात आली. गावातील प्रत्येक रस्त्यावर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित झाडझुड करून विविध स्वरूपाचे प्लास्टिक गोळा करण्यात आले. आजूबाजूला पसरलेले गवत काढण्यात आले. सर्व रस्ते स्वच्छ करून सतत तीन तास विद्यार्थ्यांनी श्रमदान केले आणि गावातील रस्ते स्वच्छ केले. या श्रमदानात गावातील खेळ मैदान, ग्रामपंचायत परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, विविध चौक आणि पुतळ्याचा परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केले. प्रत्येक वस्तीतील रस्ते झाडजूड करून स्वच्छ केले. साडेअकरा पर्यंत श्रमदान करून सर्व स्वयंसेवक शिबिरस्थळी पोहोचले.
भोजन
ठीक साडेबाराला विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. यावेळी मटर-कोबीची भाजी, वरण, भात, पोळी असे जेवण देण्यात आले.
विश्रांती
1.30 ते 3 या वेळेत सर्व स्वयंसेवकांनी विश्रांती केली.
बौद्धिक कार्यक्रम
दुपारी 3 ते 4.30 या कालावधीत बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रा. विष्णू बोरकर यांनी “लोकशाहीत मतदार नोंदणीचे गांभीर्य “या विषयावर अतिशय विस्तृत आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. या सत्राचे अध्यक्ष प्रा. वैभव मस्के हे होते. त्यांनीही लोकशाहीचा मूलअर्थ विशद करत मतदार म्हणून आपली काय जबाबदारी आहे याचे भान विद्यार्थ्यांना आणून दिले. शेवटच्या दहा मिनिटात विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले. प्रश्नोत्तरानंतर याच विषयावर गटचर्चा घेण्यात आली.
कार्यनियोजन
दुसऱ्या दिवशीच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी पाच गटातील गटप्रमुख आणि OD यांची नव्याने निवड करण्यात आली.
प्रबोधनपर कार्यक्रम
राष्ट्रीय सेवा योजनेच्या “अंधश्रद्धा मुक्ती आणि पर्यावरण रक्षणासाठी युवक” या मध्यवर्ती कल्पनेप्रमाणे पहिल्याच दिवशी भोजन झाल्यानंतर रात्री प्राचार्य डॉ. हरिभाऊ पाथोडे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन महाराष्ट्र संघटक यांचा प्रबोधनपर कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि गावकऱ्यांसाठी घेण्यात आला. अगदीच जुन्या वर्षाला निरोप देताना स्वयंसेवकांनी आपल्या मनातील जादूटोणा, भूतबाधा, अंगात देवी येणे, व्यक्तीला दैवी शक्ती बहाल करणे, हात चलाकीला दैवी शक्ती मानणे यातील कार्यकारण भाव समजून घेऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण होईल याचा प्रयत्न या प्रबोधनपर कार्यक्रमातून करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि गावकरी उपस्थित होते. ठीक दहा वाजता हा कार्यक्रम संपला आणि विद्यार्थ्यांना पहाटे जागर होणार याची कल्पना देऊन झोपण्यास सांगण्यात आले.
दि. 01/01/2023
जागर
पहाटे पाच ते सहा या दरम्यान विद्यार्थ्यांना तयारीसाठी देण्यात आले. प्रातविधी आटोपून सर्व स्वयंसेवक प्रार्थना आणि योगासनासाठी पेंडॉल मध्ये उपस्थित झाले.
प्रार्थना आणि सूक्ष्मव्यायाम
सर्व विद्यार्थ्यांना “उठे समाज के लिए उठे उठे” हे राष्ट्रीय सेवा योजनेचे लक्षगीत म्हणायला लावून “नवजवान आवरे नवजवान गावरे” हे स्फूर्ती गीत म्हणायला लावले.”हीच आमुची प्रार्थना हेच आमचे मागणे” ही प्रार्थना विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे म्हटले. प्रा मस्के यांनी सर्व विद्यार्थ्यांना नंतर सूक्ष्म व्यायाम शिकवले. त्यांना विविध प्राणायमांचे प्रकार प्रात्यक्षिक करून करायला लावले.
नाश्ता
पोहा आणि चहा नाश्ता घेऊन संपूर्ण गटप्रमुखांना श्रमदानासाठी स्मशानभूमी मिनघरी येथे नेण्यात आले.
श्रमदान
सर्व पन्नास स्वयंसेवकांना घेऊन मीनाघरी येथील स्मशानभूमीत ग्रामपंचायतच्या आदेशाप्रमाणे तसेच सहकार्याने साफसफाई करण्यात आली. बऱ्याच दिवसापासून तिथे वाढलेले गवत आणि झुडुप दर्शनी कमानी पासून अगदीच पाण्याच्या टाकीपर्यंतचा संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात आले. दुतर्फा साफसफाई झाल्याने दर्शनी भागातील रस्ता उठून दिसू लागला.
भोजन विश्रांती
आलू वांगा भाजी, वरण भात पोळी असे जेवण देऊन सर्व स्वयंसेवकांना विश्रांतीसाठी वेळ देण्यात आला.
बौद्धिक आणि गृहभेटी
दुपारी तीन ते साडेचार पर्यंत “समाज माध्यमे आणि आपण”या विषयावर श्री ज्ञानेश महाविद्यालयातील गणित विभागाचे प्रमुख अंकोश रामटेके यांचे व्याख्यान घेण्यात आले या सत्राचे अध्यक्ष प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. उमेश इंदुरकर हे होते. शेवटच्या पंधरा मिनिटात विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले. प्रश्नोत्तरानंतर हे बौद्धिक सत्र संपले. पाच ते सहा या दरम्यान गृहभेटीचे आयोजन करण्यात आले गृहभेटी संदर्भात प्रा. दुर्गेश क्षीरसागर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
आढावा आणि कार्य नियोजन
दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी संपूर्ण दिवसाच्या आढावा गटप्रमुखांच्या अहवाल वाचनाने घेऊन दिनांक 2 जानेवारीच्या संदर्भात कार्य नियोजन करण्यात आले. सर्व गटाचे नवीन गटप्रमुख आणि OD ची निवड करण्यात आली.
रात्रीचे भोजन
मसाला भात, भजी, कडी असा जेवणाचा बेत सायंकाळचा झाला. सर्व विद्यार्थ्यांनी भोजन करून प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तयारी केली.
सांस्कृतिक कार्यक्रम
रात्री आठ ते दहा या दरम्यान विद्यार्थ्यांनी लोकनाट्य, एकपात्री आणि मूकनाट्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आविष्कार केले. काही स्वयंसेवकांनी नृत्य सादर केले.
दि. 02/01/2023
प्रार्थना, योगासने आणि प्राणायाम
सकाळी पाच ते सहा विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ देण्यात आला. सहा ते सात पर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेचे लक्षगीत,आवाहन गीत, स्फूर्तीगीत घेऊन सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम या संदर्भात प्रात्यक्षिक करून स्वयंसेवकांना प्रा. मस्के यांनी मार्गदर्शन केले.
श्रमदान
दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी परत मीनघरी येथील स्मशानभूमीत ग्रामपंचायतीच्या निर्देशाप्रमाणे वृक्षारोपणासाठी जागेची साफसफाई करण्यात आली. जवळपास 100 झाडे लावण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून दोन झाडात दहा फुटाचे अंतर असावे या दृष्टीने जागा आखून घेण्यात आली. एवढ्या जागेवर व्यापलेले गवत आणि झुडुप साफसफाई करून चुन्याने झाडाचा पॉईंट टाकण्यात आला. सर्व स्वयंसेवकांनी उत्साहाने वृक्षारोपणाची तयारी केली. सकाळी साडेआठ ते साडे अकरा या दरम्यान श्रमदान झाले.
भोजन आणि विश्रांती
दुपारी श्रमदान नंतर मिक्स व्हेज वरण-भात पोळी असे जेवण करून विश्रांतीसाठी आपापल्या खोलीत दाखल झाले. दुपारच्या बौद्धिक कार्यक्रमाची सूचना अगोदरच देण्यात आली.
बौद्धिकसत्र
या दिवशीच्या बौद्धिक सत्रात प्रा. भाऊराव बाळबुद्धे यांचे पर्यावरण रक्षणात युवकांची जबाबदारीया विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यान घेण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. अस्तित मुंगमोडे हे होते. क्षेत्रातील विषयाच्या मांडणीनंतर प्रश्नउत्तरे झाली. बौद्धिक नंतर सर्वेक्षणासाठी विद्यार्थ्यांना काही प्रश्न देऊन गावात पाठवण्यात आले.
आढावा आणि कार्यनियोजन
दिवसभरातील सर्व कार्याचा आढावा घेण्यात आला आणि दिनांक 3 जानेवारी 2022 साठी कार्यनियोजन करण्यात आले. सर्व गटातून पाच गटप्रमुख आणि एक OD निवडण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रम
विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे समाज प्रबोधनपर, पर्यावरण विषयक, व्यसनमुक्ती अशा विषयाच्या अंगाने एकपात्री, एकांकिका आणि गीत गायन आणि प्रबोधनपर मूकनाट्य याचे प्रदर्शन केले. यावेळेस गावातील अनेक समाज बांधव उपस्थित होते. ठीक दहा वाजता रात्री सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यावर विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी सूचना देण्यात आले.
दि. 03/01/2023
प्रार्थना आणि योगासने
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिर स्थळी प्रार्थना लक्षगीत आणि स्फूर्ती गीत घेऊन प्राणायाम आणि योगासने घेण्यात आली. विद्यार्थ्यांना ध्यानाचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर नाश्ता देऊन श्रमदानासाठी मीनघरी येथील स्मशानभूमीत आम्ही दाखल झालो.
श्रमदान
मीनघरी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपणासाठी तयार केलेल्या जागेवर सकाळी ठीक 8.30 ते 11.30 पर्यंत एकूण 80 वृक्षांचे रोपण करण्यात आले. स्वयंसेवकांनी 1×1 या आकाराचे खड्डे खणून काढले. या सर्व खड्ड्यात जांभूळ आणि आवळा याचे रोपटे लावण्यात आले. मीनघरी च्या प्रथम नागरिक शुभांगी आत्राम आणि उपसरपंच किशोर गायकवाड यांनी या वृक्षारोपणाचे उद्घाटन केले.
वृक्षारोपणाची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी घेतली. प्रत्येक रोपट्याला एक बकेट पाणी विद्यार्थ्यांनी टाकले. या दिवशी विद्यार्थ्यांनी केलेली कामे पाहण्यासाठी भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव माननीय सदानंद बोरकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे यांनी श्रमदानाच्या ठिकाणी भेट दिली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे त्यांनी कौतुक केले.
बौद्धिक कार्यक्रम
दुपारी बौद्धिक कार्यक्रमात भाऊराव बाळबुद्धे यांनी विद्यार्थ्यांसमोर “पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्यांची जबाबदारी या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. विविध प्रदूषणाचे प्रकार आणि प्लास्टिकच्या मुक्त वापराचे पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम याच्या अभ्यासपूर्ण विश्लेषण त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अस्तिक मुंगमोडे यांनी पर्यावरणाचा स्वभाव आणि मानवी हस्तक्षेप याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून येणाऱ्या काळात पर्यावरण रक्षणात युवकांची काय जबाबदारी राहील याविषयी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरानंतर हे बौद्धिक सत्र संपविण्यात आले.
अंधश्रद्धा सर्वेक्षण
गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धेचे कोणकोणते प्रकार प्रचलित आहेत याचा अभ्यास करण्यासाठी काही प्रश्न विचारत विद्यार्थ्यांनी सर्वे केला. यामध्ये जादूटोणा, भूत भानामती, अंगात देव येणे यावरील जनतेचा विश्वास किती आहे याची पडताळणी करण्यासाठी काही प्रश्न सर्वेसाठी निश्चित करण्यात आले. घरोघरी भेट देऊन 100 लोकांच्या मुलाखती या प्रश्नासाठी घेण्यात आल्या.
सांस्कृतिक कार्यक्रम
सायंकाळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये पाडलेल्या पाचही गटात विविध विषयावर प्रहसन सादरीकरणासाठी उपविषय देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गट, महात्मा ज्योतिबा फुले गट, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट आणि संत गाडगेबाबा गट या विविध गटाने गावातील ग्रामसभेचे प्रहसन, बाजारातील घटना प्रसंगावर प्रहसन, गावातील महिलांच्या गावगप्पा, वर्गातील अध्यापनातील प्रसंग अशा विविध प्रसंगावर विद्यार्थ्यांनी प्रहसन सादरीकरण केले.
दि. 04/01/2023
प्रार्थना आणि प्राणायाम
राष्ट्रीय सेवा योजनेची लक्षगीत, स्फूर्ती गीत घेऊन प्राणायाम आणि योगासने विद्यार्थ्यांची घेण्यात आली. नाष्ट्यानंतर जनजागृती रॅली काढण्याची तयारी करण्यात आली.
गावातून समाज प्रबोधन रॅली
पर्यावरण रक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, कचऱ्याचे व्यवस्थापन, व्यसनमुक्ती अशा विविध संदेश फलक घेऊन महाविद्यालयाच्या वेशभूषा आणि ओळखपत्र घेऊन विविध घोषणा देत संपूर्ण गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली.
समरोपिय सोहळा
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचे या दिवशी समारोप घेण्यात आले. समारोपीय सोहळ्यात भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव मा. सदानंद बोरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गटातील स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात कुमारी रुचिता मेश्राम, राजन लांजेवार, अतुल बारेकर, प्रची गभणे,अफरोज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संपूर्ण शिबिरा अंतर्गत केलेल्या श्रमदानाविषयी सरपंच शुभांगी आत्राम यांनी समाधान व्यक्त केले. उपसरपंच किशोर गायकवाड यांनी परत गावकऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेला सहकार्याची हमी देऊन विविध उपक्रम राबवण्याचे आव्हान केले. प्राचार्य सुरेश बाकरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात व्यक्तिमत्वाला कसा आकार मिळतो याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरण रक्षणात आपल्या सर्वांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे असे अध्यक्ष भाषण करताना माननीय सुखदेव पाटील आनंदे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रमाधिकारी प्रा. मिलिंद फुलझेले यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि गावकरी बांधव उपस्थित होते. जेवणानंतर प्रस्थानाची तयारी करण्यात आली.
दि. 05/01/2023
या दिवशी संपूर्ण दिवसभरात प्रस्थानाची तयारी करण्यात आली.
संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा समारोप आटोपल्याने श्रमदानासाठी आणलेले साहित्य, गावातून घेतलेले स्वयंपाकाची सामग्री, महाविद्यालयातून आणलेले स्टेज डेकोरेशनचे साहित्य त्याची जुळवाजुळ करून संपूर्ण साहित्याची पडताळणी करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन महाविद्यालय प्रस्थानाची तयारी करण्यात आली. गावातील सर्व लोकांचे आभार मानून सामुग्री देऊन काही किरकोळ हिशोब करून ज्यांचे त्यांचे पैसे देण्यात आले. संपूर्ण साहित्य ट्रॅक्टर मध्ये भरून काही विद्यार्थी सोबत सामग्री सोबत बसले. दोन फेऱ्यात सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना आपापल्या गावी जाण्यासाठी विविध बस स्टॉप वर सोडण्यात आले.
अशाप्रकारे संपूर्ण आठवडाभर विशेष वार्षिक शिबिराच्या तयारीपासून आगमन आणि प्रस्थान, प्राणायाम योगासने, श्रमदान आणि बौद्धिक सांस्कृतिक कार्यक्रम याची संपूर्ण तपशीलवार माहिती, प्रस्तुत अहवालात देण्यात आला आहे.
डॉ. गजानन कोर्तलवार प्रा.हेमंत मेश्राम डॉ. सुरेश बाकरे
कार्यक्रमाधिकारी, रासेयो सहकार्यक्रमाधिकारी, रासेयो प्राचार्य
श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव श्री ज्ञानेश विद्यालय, नवरगाव श्री ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव