अस्सल रानफुलांच्या मधाचा वास नाकातून भरा… तर चला मग चिखलदरा…

       अस्सल रानफुलांच्या घट्ट मधांचे दोन-तीन थेंब जिभेवर पसरवल्यावर संपूर्ण आपले मुखेंद्रिय मधाळ होऊन जाते. आपली जीभ मधाशी एकात्म होते. या रान मधाचा अनुभव केवळ जीभच देते असे होत नाही. नाकाने या मधाचा अनुभव घेण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात नक्कीच गाविलगड किल्ल्याच्या परिसरात पायी पायी फिरले पाहिजे. हा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला चिखलदऱ्याला जावं लागेल. चिखलदर्‍याला गेल्यावर इतिहासात भक्कम नोंद असलेला गाविलगड किल्ला दिवसभरात फिरून भटकताना या रानफुलाच्या वासाने वेड लागल्याशिवाय राहत नाही.विविध रानफुलांच्या सुवासाने दरवळून गेलेला गाविलगड किल्ल्याचा परिसर म्हणजे नाकाने मधाची चव घ्यायला लावणारा… दूर दूर पर्यंत किल्ल्यांची भव्यता, पाच दरवाजे, भक्कम बुरुज आणि ऐतिहासिक तोफा तत्कालीन वैभववाची प्रचिती देते.

     किल्ल्याच्या परिसरात गाई म्हशी राखणारे काही गवळी भेटले. दत्तू येवले या गवळ्यापैकीच मध्यमवयस्क एक. सिंधीच्या पानांपासून विशिष्ट विणकाम करून अत्यंत सुंदर अशी गोलाकार टोप त्याने बनवली. त्या टोपीत विविध रंगांची रानफुले खोउन तिथे फिरायला आलेल्या पर्यटकांना 40 ते 50 रुपयाला ते विकायचे. किल्ल्यासंदर्भातील आहे तेवढी माहिती, रस्ते पर्यटकांना सांगायचे. हे काम दत्तू येवले करतो. साधारणतः दिवसभरात गाई म्हशी राखत असताना दीडशे दोनशे रुपये या टोप विक्रीतून त्याला मिळतात. किल्ल्यांच्या भोवतीचे बुरुजावरील अनेक ठिकाने, रस्ते, जिना त्या काळातील किल्ला रक्षणासाठी सैन्यांची बसण्याची जागा, तोफा दत्तू काकाने दाखविले.

     गाविलगड किल्ला म्हणजे अनेक ऐतिहासिक खानाखुणा अभ्यासायला लावणारा अत्यंत नयनरम्य असा परिसर होय.इथे आम्ही आत्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भेट दिली. किल्ल्याच्या संपूर्ण परिसराचा वेध घेताना हा काळ तसा सुखकर. भोवतालचे दूरवरील डोंगर आणि किल्ला परिसर दुरून पाहण्यासाठी पावसाळा बरा. पण हा दिवसभर पायी फिरण्यासाठी किल्ल्याच्या भोवताली असणाऱ्या डोंगर रांगा, दरी आजूबाजूचे जंगल आणि किल्ल्याची एकूण व्याप्ती जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण किल्ला अनुभवण्यासाठी पावसाळा सोडून विशेषतः हिवाळा अनुकूल राहील. या दरम्यान ही रानफुले अनुभवता येईल.

गाविलगड किल्ल्याची अधिक माहिती….

      हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे.

इतिहास

    महाभारतातल्या भीमाने कीचकाशी कुस्ती करून त्याचा इथे वध केला व त्याला बाजूच्या दरीत फेकून दिले अशी कथा आहे. कीचकाची दरी म्हणजे कीचकदरा. चिखलदरा हा कीचकदरा या शब्दाचे मराठी रूपांतर आहे. इ.स. १८०३ मध्ये दुसऱ्या मराठे-इंग्रज युद्धात या किल्ल्यावर महत्त्वाची लढाई झाली होती. ऑर्थर वेलस्लीच्या इंग्रजी सैन्याने येथे मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. त्यानंतर तिथे राण्यांनी जोहर करून स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केले.

     हा भूभाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता. तत्पूर्वी या डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा कोट उभारला होता, अशी वदंता आहे. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनीय पराक्रम केला. त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे.

गडावरील ठिकाणे

      किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ मोठे तर ३ लहान तलाव आहेत. साधारणत: ६ ते ७ तोफा असून नाजूक स्थितीमध्ये आहेत, पण त्यातील फक्त ३ तोफा अजूनही शाबूत आहेत. त्यामध्ये बिजली तोफ ही लांबीला कमी तर व्यासाला मोठी आहे, तर कालभैरव तोफ ही २० फुट लांब तर व्यासाला कमी आहे. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो.

     मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; पण तोही दुर्लक्षित आहे.

      शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम चकित करण्यासारखे आहे. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे प्रेक्षणीय अशीच आहेत. लांबरुंद पायऱ्या संपल्या की दरवाजामधून किल्ल्यात प्रवेश होतो. आतील पहारेकऱ्यांच्या उभे राहण्याच्या जागा व घुमट पाहून पुढे गेल्यावर पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चौथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा वाट अडवून उभा आहे. आज त्या दरवाज्याच्या उजव्या हाताला राजा बेनीसिंह किल्लेदाराची व त्यांच्या सैनिकांची समाधी आहे, त्या मध्ये बेनीसिंहची समाधी ही अष्टकोनी आहे तर बाकीच्या समाधी चौकोनी आहे, अशा एकूण चार समाधी आहेत. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. थोड पुढे गेल की छोटी मस्जिद असून त्यापुढे एक तलाव आहे. त्याच्या उजव्या भागास बारूद खाना असून त्याची वास्तू अजूनही शाबूत स्थितीत आहेत, त्यामध्ये ४ ते ५ फुटावर कप्पे आहेत जेणेकरून बारूदाला ओल येऊ नये. पुढे समोर गेल्यावर राण्यांची समाधी आहे, तिथे आधी ४ समाध्या होत्या आता मात्र ३ शिल्लक आहेत. त्या पासून डाव्या हाताला पुढे गेल्यावर एक शिव मंदिर आहे पण त्या मध्ये शिवपिंड आज अस्तिवात नाही तरीही ती जागा व तिथे पूर्वेस एक झरोका असलेली खिडकी आहे. समाधीच्या उजव्या बाजूने पुढे गेल्यास एक वास्तू आढळून येते ती मोठी मस्जिद असून त्या पुढे एक समाधी आहे. मोठ्या मस्जीदी मध्ये २१ झुंबर होते त्या पैकी आता १४ बाकी राहिलेले आहेत. त्या मध्ये मोठ्ठा परिसर असून त्या मध्ये शामियाना उभारण्यासाठी काही – काही अंतरावर छोटे – छोटे छिद्र आहेत. त्याला चारही बाजूने ४ सुबक नक्षी कम केलेले मिनार होते, परंतु आज मात्र एकच शिल्लक राहिला आहेत. वरती जाण्यास वास्तूच्या डाव्या बाजूस छान कोरीव पायऱ्या आहेत. त्याच्या उजव्या भागाकडून खाली उतरल्यास आपल्याला एक छान पैकी त्या काळचे पाणी शुद्धीकरण यंत्र आढळून येईल. ते पाहून पुढे गेल्यास आपल्याला पिरफत्ते दरवाजा आहे त्यापुढे बरालींगा नावाचे गाव आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाजाला लागूनच असलेले अशा प्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर सहसा आढळत नाही. मोट्या मस्जित च्या मागे किल्ल्यावरील सर्वात मोठा बुरुज आहे ज्याचे नाव बहराम बुरुज त्याला 8 मोट्या खिडक्या आहे ज्या तुन AC सारखी थंड हवेचा अनुभव होतो आणि त्या बुरुजावर एक शिलालेख सुद्धा आहे ज्यावर उर्दू किंवा अरबी भाषेत कोरलेलं आहे की पौर्णिमेच्या रात्री चंद्र व तारे या बुरुजाच्या अधीन येतात किंवा जो पर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तो पर्यंत या बुरुजचं अस्तित्त्व राहील असे काही लेखकांनी लिहिले आहे बुरुजाच्या रक्षणासाठी वरच्या बाजूला 2 बांगली तोफा सुद्धा आहे आणि बहराम बुरुजाच्या बाजूलाचं मोजरी बुरुज आहे त्याच्याच बाजूला मोजरी दरवाजा जो मोजरी गावाकडे जातो त्या गावाच्या नावावरूनच या दरवाज्याचे व बुरुजाचे नाव पडले असावे…

या किल्ल्याला १३ मार्च, इ.स. १९१३ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

कसे जाल ?

     चिखदऱ्यापासून मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक ११० किलोमीटरवर आहे. त्याचे मुंबई पासूनचे अंतर ७६३ कि.मी. आहे. एस टी महामंडळाच्या येथे येणाऱ्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर इथून नियमित सुटतात. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य गाडीमार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूरकडून धारणी, हरिसाल, सेमाडोह व तेथून चिखलदरा असा येतो. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून येत असल्यामुळे, हा गाडीरस्ता सूर्यास्त ते सूर्योदय या रात्रीच्या वेळांत बंद करण्यात येतो.

    दुसरा मार्ग अमरावती, अचलपूर, परतवडा, ते चिखलदरा असा आहे. या मार्गावर धामनगाव गढी ते चिखलदरा हा घाटरस्ता आहे. चिखलदरा येथे मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. चिखलदऱ्यापासून गाविलगडाचा बलदंड किल्ला दोन कि.मी. अंतरावर आहे. हे दोन किलोमीटरचे अंतर कोणत्याही वाहनाने पार पाडता येते. चिखलदऱ्याकडून निघालेल्या एका दांडावरील पठारावर गाविलगडाचा किल्ला बांधलेला आहे.

संदर्भ आणि नोंदी-

“नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया” (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |

Reach us @

Shri Dnyanesh Mahavidyalaya, Nawargaon,

Chimur Road, Sub-Distt – Sindewahi, Distt – Chandrapur, PIN – 441223 (M. S.)

Locate us

Our contacts

Office Hours

Monday to Friday

10:00 am – 05:00 pm

Saturday

07:30 am – 11:30 pm