मराठी विज्ञान परिषद नवरगाव शाखा तसेच श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी व भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने ‘संशोधनाकडे वळा’ या विषयावर आयसीटी मुंबई येथील संशोधक विद्यार्थी विक्रम फुलवाले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलताना म्हणाले “वैज्ञानिक संशोधन मानवी जीवन सुखी आणि समृद्धी करण्यासाठी असते. आपल्या जीवनातील विविध समस्यांना सोडवण्यासाठी आपले जे प्रयत्न असतात ते एका अर्थाने संशोधनाचा पहिला टप्पा असतो. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. खरे तर संशोधन एखाद्या प्रश्नापासून आणि समस्येपासून सुरू होते. अनेक सामान्य लोकांनी प्रतिकूलतेला तोंड देत मूलभूत संशोधन केले आहे. अशांच्या नावावर त्या शोधाचे पेटंट आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थीही चांगला अभ्यास करून विज्ञानातील आवड जोपासून संशोधनाकडे वळू शकतात.कला व विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर संशोधन करण्यासाठी विविध फिलोशीप आहेत. माहितीच्या अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडतात. आपल्याकडे असणाऱ्या मोबाईलचा सकारात्मक वापर करून संशोधनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विविध संस्थांचा शोध घेतला आणि नियमित अभ्यासाची सवय लावली तर विज्ञान संशोधनात चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. ” या वेळी मराठी विज्ञान परिषदेच्या नव्या कार्यकारणीचे पुनर्गठन झाले त्याची घोषणा झाली. कार्यकारणी आणि सदस्यांची ओळख करून देण्यात आली. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील जवळपास 300 विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते.
मराठी विज्ञान परिषद नवरगाव शाखेने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मराठी विज्ञान परिषद नववरगाव शाखेचे निमंत्रक जयंत बोरकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारून कार्यकारणीला भविष्यातील चांगल्या उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य अमृत लंजे यांनी पुनर्गठीत कार्य करण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. गजानन कोरतलवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दुर्गेश क्षीरसागर यांनी केले. तर आभार प्रा.अंकोश रामटेके यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.