श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमृत लंजे हे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभागाचे प्रमुख डॉ गजानन कोर्तलवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोहतक आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेत अडीच वर्षाच्या लेकरांपासून तर वयवर्ष साठ मधील लोकांचा मोबाईल वरील वेळ वाढत चालला आहे. तरुण वयोगटातील लोक जवळपास सात ते आठ तास आज मोबाईलवर घालवतात. रोजगाराच्या नव्या संधी आणि या क्षेत्रात वाढत असलेली स्पर्धा लक्षात घेता हे निश्चितपणे तरुणांना परवडणारे नाही. मोबाईलच्या वापरामुळे मेंदू संशोधनातील अत्यंत धोके पुढे आलेले असताना आपण सावधगिरी बाळगत नाही. हे सर्व धोके टाळायचे असेल तर समाजाने पुस्तकांशी आपले जैविक नाते जोडायला हवे. मराठीतील उत्तम उत्तम साहित्यकृती विद्यार्थ्यांनी वाचले तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला उत्तम आकार प्राप्त होतो. आपले जीवन समृद्ध करायचे असेल तर पुस्तकांशी मैत्री करावी लागेल. महाविद्यालयातील ग्रंथालयात, वाचन कक्षात खऱ्या वाचकांची गर्दी कमी झाली आहे. वाचनातूनच समाज सुसंस्कृत होतो. समाजाला दृष्टी प्राप्त होते. विविध मानवी व्यवस्थांचे आकलन अभ्यासातून आणि पुस्तकांच्या मैत्रीतून होते. शिक्षण शिकत असताना विद्यार्थ्यांनी आपला अधिक वेळ हा वाचनासाठी घालवावा असे आवाहन या निमित्ताने त्यांनी केले.
मराठी भाषा संवर्धनाचे आव्हान मराठी शाळा बंद पडत असताना निर्माण झालेले असताना, आपण बेसावध असणे परवडणारे नाही. म्हणून आपल्या भोवतालाचे समृद्ध भान पुस्तकाशी नाते जोडल्यावर येते. हे आवर्जून त्यांनी नोंदवले. पुस्तकाशी जैविक नाते जोडले पाहिजे. वाचन संस्कृती समृद्ध झाली तर निश्चितपणे मराठी भाषेच्या अभिमानाचा दिवस उजाडेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमृत लंजे यांनी मराठी विभागातील आमची भाषा आमचे पुस्तक या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना वाचनाच्या दृष्टीने प्रेरित केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ उमेश इंदुरकर डॉ हेमंत मेश्राम, प्रा अंकोश रामटेके हे यावेळी उपस्थित होते. काही विद्यार्थ्यांनी या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील शिक्षक वृंद तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शविला.